प्रतिनिधी, 26 ऑक्टोबर: चालू वनडे तिरंगी मालिकेतून पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुब बाहेर पडला आहे. फलंदाजीचा फॉर्म सुधारण्यासाठी आणि गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याची ही विनंती मान्य केली असून, उर्वरित मालिकेसाठी त्याच्या जागी साहिबजादा फरहानला संघात स्थान दिले आहे.
मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्याशी चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाने सईमला संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पीसीबीने एका निवेदनातून माहिती दिली. "सईमच्या निर्णयाचा आदर करत आणि त्याने स्वतःच्या सध्याच्या फॉर्मबद्दल केलेल्या प्रामाणिक मूल्यमापनाचे कौतुक करत, संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीने परस्पर सहमतीने त्याची विनंती मान्य केली आहे," असे बोर्डाने म्हटले आहे. तसेच, उर्वरित सामन्यांसाठी सईमचा बदली खेळाडू म्हणून फरहानच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचेही स्पष्ट केले.
या मालिकेत फखर झमानसोबत सलामीला उतरणाऱ्या सईमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या तीन डावांत मिळून त्याने केवळ २१ धावा केल्या. १८ ऑक्टोबरला श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने त्याला ७ धावांवर (८ चेंडू) बाद केले. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध सनी बेकरच्या गोलंदाजीवर त्याने ६ चेंडूंत ८ धावा केल्या. तर २५ ऑक्टोबरला पुन्हा इंग्लंडविरुद्ध खेळताना हेन्री क्रोकॉम्बेने त्याला १२ चेंडूंत ६ धावांवर माघारी पाठवले.
दरम्यान, सलग तीन सामने जिंकून पाकिस्तानने यापूर्वीच अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होणार असून त्यापूर्वी फरहान संघात सामील होईल. फरहानने आतापर्यंत ६ वनडे सामन्यांत १६.८३ च्या सरासरीने आणि ७५.९३ च्या स्ट्राईक रेटने १०१ धावा केल्या आहेत. तसेच लिस्ट 'ए' मधील ८१ सामन्यांत त्याच्या नावावर ४०.०६ च्या सरासरीने ३,१६५ धावांची नोंद असून यात ८ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे.
अलीकडचा खराब फॉर्म वगळता सईम अयुबची वनडेतील एकूण कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने २० वनडे सामन्यांत ४०.६३ च्या सरासरीने व ९९.३६ च्या स्ट्राईक रेटने ७७२ धावा जमवल्या आहेत. त्यात नाबाद ११३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, इतर प्रकारांमध्ये त्याची कामगिरी फारशी प्रभावी नाही. ९ कसोटी सामन्यांत त्याने २२.७५ च्या सरासरीने केवळ ३६४ धावा केल्या असून त्यात तीन अर्धशतके आहेत, पण एकही शतक नाही.
तसेच, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सईमने ७१ सामन्यांतील ६७ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. या फॉरमॅटमध्ये २१.१९ च्या सरासरीने आणि १३६.४२ च्या स्ट्राईक रेटने त्याने एकूण १,३५६ धावा केल्या असून त्याच्या नावावर सहा अर्धशतकांची नोंद आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण थांबवा, थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा; एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला आदेश
- न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर गौतम गंभीरची तीन शब्दांची भन्नाट प्रतिक्रिया; तिलक-नितीशच्या खेळीचे केले कौतुक
- भारत विरुद्ध न्यूझीलंड: विजयानंतर आनंद साजरा करण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी नितीश-तिलकला का घेरले?




