क्राइस्टचर्च, 24 ऑक्टोबर: क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार गडी राखून रोमहर्षक पराभव केला. या लढतीत भारताने १९.५ षटकांत सहा गडी गमावून १८१ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले. २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या तिलक वर्माला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यानंतर तिलकने विजयाचे रहस्य उलगडताना प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या महत्त्वपूर्ण सल्ल्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था एका क्षणी बिकट झाली होती. शेवटच्या तीन षटकांत भारताला विजयासाठी ४६ धावांची आवश्यकता होती आणि संघाचे सहा गडी बाद झाले होते. त्यावेळी तिलक १३ चेंडूंमध्ये १७ धावांवर, तर नितीश रेड्डी ९ चेंडूंमध्ये १६ धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर तिलकने सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक चेंडू शिल्लक ठेवून भारताला विजय मिळवून दिला.
पाच गडी बाद झाल्यानंतर तुमची मानसिकता काय होती, या प्रश्नावर तिलकने आपली रणनीती स्पष्ट केली. तो म्हणाला की, त्या परिस्थितीत फक्त शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहण्याचा माझा विचार होता. सामन्यापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर सर आणि सितांशु कोटक सर यांच्याशी माझे बोलणे झाले होते. 'आमचा आणि संपूर्ण भारताचाही तुझ्यावर विश्वास आहे, जर तू शेवटपर्यंत टिकून राहिलास, तर तू आमच्यासाठी सामना जिंकून देशील,' हा त्यांनी दिलेला कानमंत्र माझ्या डोक्यात घोळत होता, असे तिलकने सांगितले.
हा सामना शक्य तितका पुढे नेण्याची योजना असल्याचे तिलकने स्पष्ट केले. मागच्या सामन्याच्या तुलनेत खेळपट्टी थोडी संथ असल्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध वेगाने धावा पळण्याचे त्याने नमनला सांगितले होते. मिचेल सँटनरच्या शेवटच्या षटकात नमन दुर्दैवाने बाद झाला, अन्यथा १८ व्या षटकातच सामना संपवला असता, असे तिलकने म्हटले आहे. नमनच्या चांगल्या खेळाचे कौतुक करत, शेवटी 'हैदराबादच्या मुलांनी' म्हणजेच स्वतः आणि नितीश रेड्डीने मिळून केलेल्या या कामगिरीमुळे सामना जिंकल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- फिन ॲलनची सीमारेषेवर सुपरमॅनसारखी झेप अन् मिचेलचा रिले कॅच; न्यूझीलंडने असा टिपला अक्षर पटेलचा झेल!
- IND vs NZ: पराभवाच्या छायेतून भारताचा थरारक विजय; तिलक-नितीशच्या खेळीने मालिका २-० ने खिशात
- IND vs NZ : ५ बाद ७० वरून तिघांनी सामना फिरवला, भारताचा न्यूझीलंडवर त्यांच्याच देशात सलग दुसरा थरारक विजय




