न्यूझीलंडविरुद्धच्या विक्रमी विजयाचा हिरो संजू सॅमसनने मनं जिंकली; म्हणाला, ‘मी कोणाला चुकीचं सिद्ध…’

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने ३३ चेंडूत ६७ धावांची खेळी करत भारताला २२६ धावांचे आव्हान पार करून दिले.

mahasatta

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत टीम इंडियाने रोमहर्षक विजय नोंदवला आहे. या विजयाचा प्रमुख हिरो सलामीवीर संजू सॅमसन ठरला. त्याने ३३ चेंडूत ६७ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला आतापर्यंतचे सर्वात मोठे टार्गेट यशस्वीपणे पार करून दिले.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २२६ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. टीम इंडियाने हे लक्ष्य दोन चेंडू राखून पूर्ण केले. या विक्रमी विजयासोबतच संजू सॅमसनने एक खास जागतिक विक्रमही आपल्या नावावर नोंदवला. टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने सात वेळा ही कामगिरी करत इंग्लंडच्या जॉस बटलरला (६ वेळा) मागे टाकले आहे. या यादीत क्विंटन डिकॉक ४, तर शे होप आणि फिल सॉल्ट यांनी प्रत्येकी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.

'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सॅमसनने यष्टीरक्षणाचा फलंदाजीत कसा फायदा होतो, हे स्पष्ट केले. "क्राईस्टचर्चमधील या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात खूप बदल झाला. पहिल्या डावात चेंडू थोडा थांबून येत होता, मात्र नंतर दवामुळे चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे बॅटवर येत होता," असे तो म्हणाला. विकेटकीपिंग करतानाच आपण या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, याचा विचार करत असल्याचे त्याने सांगितले.

भारताकडून खेळताना येणाऱ्या दबावाबद्दल बोलताना संजूने मनमोकळेपणाने आपले विचार मांडले. तो म्हणाला, "भारतासाठी खेळणे सोपे नसते. इथे खूप आवाज असतो आणि प्रत्येकाचे एक मत असते. मात्र, लोक सोशल मीडियावर काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही आणि कोणाला चुकीचे सिद्ध करण्यासाठीही मी खेळत नाही."

आपण केवळ स्वतःच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो आणि सरावाचा आदर करतो, असे संजूने स्पष्ट केले. मी कोणाला चुकीचे ठरवण्याच्या उद्देशाने डोक्यात विचार ठेवून मैदानावर उतरत नाही, तर फक्त माझे क्रिकेट खेळण्यावर आणि त्याचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करतो, अशी भावना त्याने सामन्यानंतर व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या