क्राइस्टचर्च, 22 ऑक्टोबर: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २२६ धावांच्या महाकाय लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या विक्रमी विजयाचा शिल्पकार संजू सॅमसन ठरला. उजव्या हाताच्या या फलंदाजाने अवघ्या ३३ चेंडूंत ६७ धावांची वादळी खेळी केली. टीम इंडियाने २ गडी राखून नव्हे तर २ चेंडू राखून हा सामना खिशात घातला. सामन्यानंतर 'सामनावीर' पुरस्कार स्वीकारताना संजूने या मोठ्या रनचेसचे रहस्य उलगडले.
यष्टीरक्षण करताना खेळपट्टीचा अंदाज बांधायला मदत होते, असे संजूने सांगितले. मात्र, क्राइस्टचर्च येथील या सामन्यात दुसऱ्या डावात खेळपट्टीचे स्वरूप पूर्णपणे बदलल्याचे त्याने नमूद केले. "यष्टीरक्षण करताना या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची याचा मी विचार करत होतो. पण प्रत्यक्षात फलंदाजीला आलो तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पहिल्या डावात चेंडू थांबून येत होता, मात्र दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात चेंडू बॅटवर चांगला येऊ लागला. मी आणि इतर फलंदाजांनी या फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला," असे संजूने स्पष्ट केले.
या अफलातून खेळीच्या जोरावर संजू सॅमसनने एका खास विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणारा तो पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. संजूने ही किमया ७ वेळा साधली आहे. या यादीत इंग्लंडचा जोस बटलर (६ वेळा) दुसऱ्या स्थानावर आहे. तर क्विंटन डी कॉक (४ वेळा) आणि शाई होप व फिल सॉल्ट यांनी प्रत्येकी ३ वेळा अशी कामगिरी करत या यादीत स्थान मिळवले आहे.
आपल्या वैयक्तिक कामगिरीबरोबरच संजूने सोशल मीडियावरील टीकेवरही सडेतोड भाष्य केले. कोणालाही चुकीचे ठरवण्यासाठी आपण क्रिकेट खेळत नसल्याचे त्याने ठणकावून सांगितले. "लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही. भारतासाठी खेळणे सोपे नसते, तिथे भरपूर चर्चा आणि गोंधळ असतो. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. पण सोशल मीडियावरील या चर्चांकडे मी लक्ष देत नाही. माझा माझ्या खेळावर विश्वास आहे आणि केवळ क्रिकेट खेळण्यावरच माझे लक्ष असते," अशी स्पष्ट भूमिका संजूने मांडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- कॅच पकडण्यासाठी किवी खेळाडूची हवेत ‘सुपरमॅन’ डायव्ह, व्हिडीओ व्हायरल; भारताचा ऐतिहासिक विजय
- टी-२० मध्ये टीम इंडियाचा नवा विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध २२६ धावांचे लक्ष्य गाठून रचला इतिहास
- अन् एका चुकीने गेम फिरला: न्यूझीलंडने कॅच सोडला अन् श्रेयस अय्यरने बॉलरची पिसे काढली!




