प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: रणजी करंडक २०२६-२७ च्या हंगामात मिझोरामकडून खेळताना २९ वर्षीय चिन्मय सुतारने नाबाद ४०० धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल ७७ वर्षांनंतर एका डावात ४०० धावांचा टप्पा पार करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या या ऐतिहासिक विक्रमात अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या खेळाडूनेही अत्यंत मोलाची साथ दिली.
सध्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचे सामने खेळवले जात आहेत. प्लेट ग्रुपअंतर्गत सोविमा येथे सोमवारी नागालँडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात चिन्मयने हा पराक्रम केला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात त्याने १८१ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तुफान फटकेबाजी करत त्याने ५१७ चेंडूंचा सामना करताना ४६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ४०० धावांची नाबाद खेळी पूर्ण केली. त्याच्या या दमदार प्रदर्शनानंतर मिझोरामने आपला डाव ९ बाद ५८१ धावांवर घोषित केला.
चिन्मयच्या या ऐतिहासिक खेळीत लालरेमपुइया छकछुआक या ११ व्या क्रमांकावरील फलंदाजाचे योगदान निर्णायक ठरले. मिझोरामची अवस्था ९ बाद ३९२ अशी असताना छकछुआक मैदानात आला. त्याने एका बाजूने खेळपट्टीवर तग धरताना ७६ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या. चिन्मयने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी तब्बल १८९ धावांची भक्कम भागीदारी रचली.
चिन्मय सुतारने याच महिन्याच्या सुरुवातीला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मणिपूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ३५ तर दुसऱ्या डावात ९९ धावा केल्या होत्या. तसेच, या वर्षी जानेवारीत विजय हजारे करंडक स्पर्धेत त्याने मुंबईकडून महाराष्ट्राविरुद्ध पहिला 'लिस्ट ए' सामना खेळला होता. केवळ २ धावांवर बाद झालेल्या त्या सामन्यात यशस्वी जैस्वाल, मुशीर खान, तुषार देशपांडे, सिद्धेश लाड आणि शार्दूल ठाकूर यांसारखे दिग्गज खेळाडू संघात होते. याव्यतिरिक्त, २०१९ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेच्या 'इमर्जिंग टीम्स कप'मध्ये त्याने भारताच्या उदयोन्मुख संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे.
रणजी करंडकाच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बी. बी. निंबाळकर यांच्या नावावर आहे. त्यांनी १९४८-४९ च्या हंगामात नाबाद ४४३ धावा केल्या होत्या. आता ४०० धावांसह चिन्मय सुतार दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत पृथ्वी शॉ (३७९) तिसऱ्या, संजय मांजरेकर (३७७) चौथ्या, एम. व्ही. श्रीधर (३६६) पाचव्या, तनाय अग्रवाल (३६६) सहाव्या, विजय मर्चंट (नाबाद ३५९) सातव्या, समित गोहेल (नाबाद ३५९) आठव्या आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (३५३) नवव्या क्रमांकावर आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ता; अजित आगरकरांप्रमाणेच मिळणार पगार, आकडा जाणून घ्या
- प्रज्ञान ओझा बीसीसीआयचे नवे मुख्य निवडकर्ता! रमेश पोवार यांचीही निवड समितीत एन्ट्री
- संघातून डावलल्यानंतर रिंकू सिंगचे बॅटीने चोख उत्तर; रणजी करंडकात झळकावली सलग दोन शतके




