२०२१ पासून संघात संधी नाही; अखेर मराठमोळ्या पूनम राऊतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

२०२१ पासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या मराठमोळ्या पूनम राऊतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली.

mahasatta

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ती भारताकडून शेवटचा सामना खेळली होती. तेव्हापासून संघात संधी न मिळाल्याने अखेर गुरुवारी तिने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली.

वयाच्या ३७ व्या वर्षी पूनमने एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या या मराठमोळ्या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चार कसोटी सामन्यांच्या सात डावांत २६४ धावा केल्या. तसेच, ७३ एकदिवसीय सामन्यांच्या ७३ डावांमध्ये २२९९ धावा आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ३१ डावांमध्ये ७१९ धावांची नोंद केली आहे.

२०१७ च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती. या संपूर्ण स्पर्धेत तिने ३८१ धावा केल्या, ज्यामध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातील ८६ धावांच्या बहुमूल्य खेळीचा समावेश आहे.

निवृत्तीची माहिती देताना पूनमने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, "मुंबईच्या रस्त्यांपासून ते भारतीय जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास एका आशीर्वादापेक्षा कमी नाही. या प्रवासात अनेक त्याग, संघर्ष, अविस्मरणीय विजय आणि कठीण धडे होते, जे क्षण मी आयुष्यभर जपेन. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही केवळ स्वप्नपूर्ती नव्हती, तर तो एक बहुमान होता, जो मी मोठ्या अभिमानाने मिरवला."

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा अध्याय संपवताना, आपल्यावर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्या आणि या प्रवासाचा भाग असलेल्या सर्वांप्रती तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या